ही बालवाडी आहे, आम्ही २००७ साली बांधलेली. आम्ही ही बालवाडी एका वर्तुळाच्या आकारात बांधली आहे. म्हणजे छपरावर हा एक प्रकारचा अखंड मार्ग आहे. तुम्ही जर पालक असाल, तर तुम्हाला ठाऊक असेलच,की मुलांना गोल गोल फिरायला खूप आवडतं. हे पहा, छप्पर वरून असं दिसतं. तर, आम्ही हे असं का बांधलं? या बालवाडीचे मुख्याध्यापक म्हणाले, " नाही. मला इथे कठडा नको." मी म्हणालो, "ते शक्य नाही." पण त्यांनी आग्रह सोडला नाही. छपराच्या कडेने एक जाळी सोडली तर? पडणारी मुलं त्यात पकडता येतील. (हशा ) मी म्हणालो, "ते शक्य नाही." अर्थात, सरकारी अधिकारी म्हणाले, "कठडा तर हवाच." पण ही कल्पना झाडांभोवती ठेवता येईल. इथे छपरामधून डोकं वर काढणारी तीन झाडं आहेत. या दोरालाच कठडा म्हणायची आम्हाला परवानगी मिळाली. पण अर्थातच, त्या दोराशी मुलांचा काही संबंध नाही. ती आपली सरळ त्या जाळीत पडतात. आणखी मुलं. आणखी जास्त. आणखी. (हशा ) कधीकधी एका झाडाभोवती चाळीस मुलं असतात. त्या फांदीवरच्या मुलाला ते झाड इतकं आवडतंय, की तो ते चाखतो आहे. (हशा ) काही कार्यक्रम असेल, तेव्हा मुलं छपराच्या कडेवर बसतात. खालून पाहताना ते किती छान दिसतं. प्राणीसंग्रहालयातली माकडं. (हशा ) जेवायची वेळ. (हशा आणि टाळ्या) आम्ही या छपराची उंची कमीत कमी ठेवली. कारण आम्हाला छपरावरची मुलं बघायची होती. फक्त छपराखालचीच नव्हेत. जर छप्पर खूप उंच केलं असतं, तर फक्त आतलं छत दिसलं असतं. आणि ही पाय धुवायची जागा. पाण्याचे नळ अनेक प्रकारचे असतात. या लवचिक नळ्या वापरून मित्रांवर पाणी उडवता येतं. आणि हा शॉवर. हा साधाच आहे. पण हे पाहिलंत का, हा मुलगा आपले बूट धुवत नसून, त्या बुटात पाणी भरतो आहे. (हशा ) वर्षभर ही बालवाडी अशी पूर्णपणे खुली असते. आत आणि बाहेर यामध्ये सीमारेषाच नसते. तर याचा अर्थ असा की, ही इमारत म्हणजे केवळ एक छप्पर आहे. आणि दोन वर्गांमध्येही भिंती नाहीत. म्हणजेच, आवाजाला अटकाव नाही. पुष्कळ मुलांना जर एखाद्या शांत खोलीत बसवलं, तर त्यातली काही मुलं अतिशय अस्वस्थ होतील. पण या बालवाडीत त्यांना अस्वस्थ वाटायचं काहीच कारण नाही. कारण इथे भिंतीच नाहीत. आणि मुख्याध्यापक म्हणतात, जर त्या कोपऱ्यातल्या मुलाला वर्गात बसावसं वाटत नसेल, आम्ही त्याला बाहेर जाऊ देतो. तो अखेरीस परत येईल. कारण हे वर्तुळ आहे. ते परत येणारच. (हशा ) पण मुद्दा असा आहे, की अशा परिस्थितीत मुलं कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतात. पण इथे मात्र, ती जातात आणि परत येतात. स्वाभाविकच आहे ते. दुसरं, आम्हाला गडबड गोंधळ खूप महत्त्वाचा वाटतो. मुलं गोंधळातच शांत झोपतात. शांत जागी त्यांना झोप लागत नाही. आणि या बालवाडीमध्ये, मुलं वर्गात कमालीची एकाग्रता दाखवतात. आपल्यासारखे प्राणी जंगलात, गोंधळातच वाढतात. गोंधळ हा त्यांना गरजेचा असतो. एखाद्या बारमध्ये गलका असला, तरीही तिथे आपण मित्रांशी बोलू शकतो. गप्प बसून राहणं हा आपला स्वभावच नव्हे. आजकाल आपण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहतो. ही शाळा पूर्णपणे खुली आहे. तुम्हाला ठाऊक असेलच, की हिवाळ्यात उणे २० डिग्री तापमान असताना स्कीईंग करता येतं. उन्हाळ्यात आपण जेव्हा पोहायला जातो, तेव्हा वाळूचं तापमान असतं ५० डिग्री. तसंच तुम्हाला ठाऊक असायला हवं, की आपण जलरोधक असतो. आपण पावसात विरघळत नाही. तर, मुलांनी बाहेरच राहायचं असतं. आणि आपण त्यांना तसंच राहू दिलं पाहिजे. तर ही मुलं वर्गाची अशी विभागणी करताहेत. त्यांनी शिक्षकांना मदत करायला हवी. पण ते कुठे मदत करताहेत? (हशा ) मी नाही त्याला आत घातलं! हा वर्ग. हे बेसिन. पाणवठ्याभोवती मुलं एकमेकांशी गप्पा मारतात. आणि वर्गात नेहमीच झाडं असतात. एका माकडाला वर ओढून घेणारा दुसरा माकड. (हशा ) माकडं. (हशा ) प्रत्येक वर्गात एकतरी झरोका असतोच. आणि ख्रिसमसला, सेंटाक्लॉस इथून खाली उतरतो. आणि ही शाळेला जोडलेली इमारत. त्या गोल बालवाडीच्या शेजारची. ही सातमजली इमारत फक्त पाच मीटर उंच आहे. आणि अर्थातच, छताची उंची अगदी कमी आहे. त्यामुळे ती इमारत सुरक्षित हवी. तर, आम्ही आमच्या मुलांना तिथे सोडलं. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. त्याचं डोकं आपटलं. तो ठीक आहे. त्याचं डोकं चांगलं मजबूत आहे. तो लवचिक आहे. माझा मुलगा आहे तो. (हशा ) इथून उडी मारण्यात धोका तर नाही ना, हे तो पाहतो आहे. मग आम्ही इतर मुलांना तिथे जाऊ दिलं. तोक्योतला ट्रैफ़िक जैम भयंकर असतो. (हशा ) त्या पुढच्या ड्रायव्हरने ड्रायव्हिंग शिकायला हवंय. आजकालच्या दिवसांत, मुलांना धोक्याची लहानशी गुटी मिळायला हवी. आणि अशा परिस्थितीत, ते एकमेकांना मदत करायला शिकतात. यालाच समाज म्हणातात. हल्ली अशा संधी आपण गमावत चाललो आहोत. आता या चित्रात एका मुलाची हालचाल दाखवली आहे. ९:१० ते ९:३० या वेळेतली. आणि या इमारतीचा परीघ १८३ मीटर आहे. म्हणजे हे अंतर अगदी छोटं आहे असं म्हणता येणार नाही. या मुलाने सकाळी ६००० मीटर अंतर पार केलं. पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. या बालवाडीतली मुलं सरासरी ४००० मीटर अंतर पार करतात. आणि या मुलांची शारीरिक क्षमता इतर मुलांपेक्षा जास्त आहे. मुख्याध्यापक म्हणतात, आम्ही त्यांना प्रशिक्षण देत नाही. फक्त छपरावर सोडतो. मेंढरांसारखं. (हशा ) ती धावत राहतात. (हशा ) माझं मत असं, की त्यांना नियंत्रणात ठेवू नका. त्यांना फार जपू नका. त्यांनी थोडं धडपडायला हवं. त्यांना थोडी दुखापत व्हायला हवी. त्यातूनच ती शिकतात, या जगात कसं जगायचं. मला वाटतं, स्थापत्यशास्त्र जग बदलू शकतं. आणि लोकांचं आयुष्यही. आणि हा एक प्रयत्न आहे, मुलांचं आयुष्य बदलण्याचा. अनेक धन्यवाद. (टाळ्या )