१९९९ मधला हा माझा एक आनंदी फोटो. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची डान्स प्रॅक्टिस नुकतीच संपली होती. मी खूप खूप आनंदात होतो. त्यानंतर एका आठवड्याने मी कुठे होतो, ते पक्कं आठवतंय मला. मी कॅम्पसच्या पार्किंग लॉटमध्ये माझ्या सेकंडहँड मिनीव्हॅनच्या मागच्या भागात बसलो होतो. त्यावेळी तिथे बसून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय घेतल्यानंतर लगेचच मी सविस्तर बेतसुद्धा आखला. पूर्वी कधीच आलो नसेन, इतका कड्याच्या पार टोकाशी आलो. केवळ नशीबानेच काही योगायोग घडले, आणि त्यांनी मला चाप ओढण्यापासून रोखलं. त्या घटनेनंतर, काय घडू शकलं असतं या जाणिवेनेच मी हादरलो. मग मी मनाला वाटणारी उभारी आणि खंत हाताळण्याचे निरनिराळे मार्ग पद्धतशीरपणे अजमावून पहिले. हा उद्योग फायदेशीर ठरला. अनेक सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात खोल नैराश्याचे कालखंड ६ ते १० वेळा येऊ शकतात. मला आनुवांशिक द्विध्रुवी नैराश्यविकार आहे. आजवर माझ्या आयुष्यात असे कालखंड पन्नासेक वेळा आले आहेत. मी त्यातून खूप काही शिकलो आहे. नैराश्याच्या अंधाराशी मी अनेकदा लढलो आहे, आणि अनुभव नोंदून ठेवले आहेत. म्हणूनच मी ठरवलं, की यशाची गुरुकिल्ली किंवा माझ्या विजयाची क्षणचित्रे, असं काही सांगण्याऐवजी, स्वतःचा नाश होऊ नये म्हणून, किंवा हतबलता येऊ नये म्हणून मी काय केलं, ते सांगायचं. माझ्या बिझिनेसविषयी सर्वोत्तम निर्णय घेताना मदतीला येणारं सुरक्षा तंत्रच मानसिक पतनातून सावरण्यासाठीही हमखास उपयोगी पडतं, असं मला आढळलं. पण ते महत्त्वाचं नाही. स्थितप्रज्ञता. हा शब्दच कंटाळवाणा आहे. (हशा) स्पॉकची आठवण आली ना? कसा दिसेल तो? (हशा) पावसात उभ्या राहिलेल्या गायीसारखा. दुःखी नव्हे. फार आनंदीही नव्हे. वाट्याला आलेलं आयुष्य भावनाशून्य मनाने जगणारा प्राणी. कदाचित तुम्हाला बिल बेलिचेक आठवला नसेल. अतिशय स्पर्धात्मक वृत्तीचा न्यू इंग्लंड पेट्रियटसचा प्रमुख प्रशिक्षक. एनएफएल सुपरबॉल मधल्या विजयांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. गेल्या काही वर्षांत एनएफएलच्या सर्वोत्कृष्ठ टीम्समध्ये मानसिक कणखरपणासाठी स्थितप्रज्ञता शिकवणं प्रचलित झालं आहे. तुम्हाला कदाचित तीन राष्ट्रपुरुष आठवले नसतील - थॉमस जेफरसन, जॉन ऍडम्स, जॉर्ज वाॅशिंग्टन स्थितप्रज्ञ वृत्तीचे अभ्यासक. जॉर्ज वाॅशिंग्टनने व्हॅली फोर्जमधल्या आपल्या सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी एका स्थितप्रज्ञाबद्दलचं "कीटो..एक शोकांतिका" हे नाटक दाखवलं होतं. असे कर्तबगार लोक स्थितप्रज्ञतेचं प्राचीन तत्त्वज्ञान का कवटाळत असतील? यात शिकण्यासारखं बरंच काही आहे. मी तर म्हणेन, धकाधकीच्या आयुष्यात टिकून राहण्यासाठी योग्य निर्णय घेताना स्थितप्रज्ञताच कामी येते. तर हा विचार काहीसा इथे सुरु झाला, या पोर्च वर. ख्रिस्तपूर्व ३०० साली अथेन्स शहरी, झिनो नामक व्यक्ती पोर्चभोवती व्याख्याने देत असे. त्या रंगीत पोर्चला म्हणत, स्टोआ. त्यावरून, स्टोईसिझ्म (स्थितप्रज्ञता) ग्रीक - रोमन समाजाने ही संकल्पना अनेक गोष्टींसाठी वापरली. त्यापैकी आपल्या उपयोगाची गोष्ट म्हणजे, स्व-प्रशिक्षण. आपल्या नियंत्रणातल्या आणि नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ओळखणे, आणि पहिल्या प्रकारच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करणे. यामुळे भावनेच्या आहारी जाणे कमी होते. ही एक मोठीच शक्ती आहे. याविरुद्ध उदाहरण: फुटबॉलच्या खेळात एखादी खेळी चुकल्यामुळे खेळाडू जर स्वतःवरच चिडला, तर उरलेला सामना पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. एखाद्या निष्णात कर्मचाऱ्याच्या बारीकशा चुकीमुळे जर कंपनीचा सी ई ओ त्याच्यावर उखडला, तर कंपनीला तो कर्मचारी गमवावा लागू शकतो. अधोगतीला लागलेला एखादा कॉलेजकुमार, निराशा आणि हतबलतेच्या फेऱ्यात सापडल्यामुळे प्राण गमावू शकतो. इथे महत्त्वाच्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात. त्या साध्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. २००४ साली माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या मार्गाबद्दल आता सांगतो. त्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या: माझा एक अत्यंत जवळचा मित्र अनपेक्षितपणे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे मरण पावला. त्यानंतर, मी जिच्याशी लग्न करणार होतो, ती माझी मैत्रीण मला दुरावली. ती वैतागली होती. तिने मला "डियर जॉन" लिहिलेलं पत्र दिलं नाही, तर त्याऐवजी दिला, "डियर जॉन" लिहिलेला फलक. (हशा) खरंच सांगतोय. अजून आहे तो माझ्याजवळ. "कामाची वेळ पाच वाजता संपते." तो टेबलावर ठेवावा, म्हणून दिला होता. माझ्या आरोग्यासाठी. कारण त्यावेळी मी माझ्या पहिल्या बिझिनेसचं काम करीत होतो. चाचपडत होतो. दिवसाला चौदा तासांहून जास्त काम करीत होतो. आठवड्याचे सातही दिवस. उत्साह टिकवण्यासाठी उत्तेजक औषधं घेत होतो. तशीच झोपेसाठीही औषधं घेत होतो. परिस्थिती कठीण होती. मी पूर्णपणे अडकून पडलो होतो. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी सुलभता या विषयावरचं एक पुस्तक आणलं. आणि आयुष्यात मोठाच बदल घडवणारा एक विचार मला त्यात सापडला. "वास्तवापेक्षा कल्पनेतच आपण जास्त त्रास भोगतो." लेखक, "सेनेका द यंगर". प्रसिद्ध स्थितप्रज्ञ लेखक. मग मी, त्यांनी लिहिलेली पत्रं वाचली. त्यातून सापडला एक अभ्यास प्रकार. "प्रीमेडिटाटिओ मलोरम" म्हणजे, वाईट गोष्टींचं पूर्वचिंतन. सोप्या शब्दांत, अत्यंत वाईट गोष्टीं घडण्याच्या भीतीमुळे आपण काही करू धजत नाही, अशावेळी त्याच गोष्टी सविस्तर रूपात पाहणे. यामुळे आपण त्या हतबलतेवर मात करण्यासाठी काहीतरी करू शकतो. मला सतावत होतं माझं माकडरुपी मन. मोठमोठ्याने अखंड बडबडणारं. या प्रश्नांचा केवळ मनात विचार करून भागत नाही. ते कागदावर उतरवावे लागतात. मग मी स्वतःसाठी एक लेखी साचा तयार केला. त्याला नाव दिलं, भीती-निश्चिती. ध्येय-निश्चिती सारखंच. यात तीन पानं आहेत. अगदी सोपं आहे. हे पहिलं पान: "मी जर ... ?" इथे लिहायची तुमची भीती. तुम्हाला चिंतातुर करणारी कोणतीही गोष्ट. सतत टाळलेली गोष्ट. कुणाला डेटसाठी विचारणं असेल, किंवा कुणाशी संबंध तोडणं. नोकरीत पगारवाढ मागणं, नोकरी सोडणं, व्यवसाय सुरु करणं, काहीही. माझ्या बाबतीत ही गोष्ट होती, चार वर्षांत प्रथमच एका महिन्याची सुट्टी घेणं. व्यवसायापासून लांब लंडनला जाऊन एका मित्राच्या घरी विनाखर्च राहणं. व्यवसायातून स्वतः बाजूला होणं, किंवा व्यवसाय बंद करणं. पहिला कॉलम, व्याख्या. एखादं पाऊल उचलल्यामुळे होऊ शकणाऱ्या सर्व वाईट गोष्टींबद्दलच्या तुमच्या कल्पना इथे लिहा. १० ते २० तरी हव्यातच. दोन उदाहरणं देतो. एक, मी लंडनला जाईन. तिथे पावसाळी हवा असेल. मला नैराश्य येईल. सगळा वेळ वाया जाईल. दोन, मी लंडनला असताना इथे इन्कम टॅक्सची नोटीस आलेली असेल. मग ऑडिट होईल. किंवा माझ्यावर छापा टाकतील किंवा टाळं लावतील वगैरे काहीतरी. मग पुढचा कॉलम "प्रतिबंध" यात पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा: या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी काय करावं? किंवा, निदान त्या गोष्टी घडण्याची शक्यता थोडीशी कमी कशी करावी? तर, लंडनमध्ये उदास वाटू नये म्हणून मी माझ्याबरोबर एक निळा दिवा घेऊन जाऊ शकतो. आणि तो रोज सकाळी १५ मिनिटं वापरू शकतो. त्यामुळे नैराश्य येण्याचं प्रमाण कमी होतं. इन्कम टॅक्स ऑफिसला मी माझ्या अकौंटंन्टचा पत्ता देऊ शकतो. म्हणजे ती नोटीस माझ्या पत्त्याऐवजी त्याच्या हाती पडेल. किती सोपं आहे! पुढचा कॉलम, दुरुस्ती म्हणजे, त्या अतिशय वाईट गोष्टी घडल्याच, तर त्यांची, निदान थोडीशी तरी, दुरुस्ती कशी करावी? कोणाकडे मदत मागावी? तर, लंडनच्या बाबतीत, मी थोडा खर्च करून विमानाने स्पेनला जाईन, सूर्यप्रकाश पाहीन. नैराश्य दुरुस्त करून उत्साही होईन. इन्कम टॅक्सच्या बाबतीत, मी माझ्या वकील मित्राला किंवा लॉ प्रोफेसर मित्राला फोन करीन. त्यांचा सल्ला घेईन. त्यांना विचारीन, अशा वेळी लोक काय करतात? हे पहिलं पान लिहिताना एक प्रश्न लक्षात ठेवायला हवा. आजपर्यंतच्या इतिहासात आपल्याहून कमी चातुर्य आणि प्रेरणा असणाऱ्या एखाद्या माणसाने हा प्रश्न सोडवला आहे का? उत्तर होकारार्थी येण्याची दाट शक्यता आहे. (हशा) दुसरं पान सोपं आहे. प्रयत्न करण्याचे किंवा थोडंसंच यश मिळण्याचे फायदे काय असू शकतील? आपण इथे भीतीला झुकतं माप देतो आहोत आणि सकारात्मक गोष्टींकडे जरा बेतानेच बघतो आहोत. आपण आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले, तर आत्मविश्वास वाढू शकेल का? भावनिक, आर्थिक किंवा इतर विकास होईल का? आणि ठोकलाच षटकार, तर काय फायदे होतील? या पानावर १० ते १५ मिनिटं वेळ द्या. पान तीन. हे सर्वात महत्त्वाचं आहे, गाळू नका. "निष्क्रियतेमुळे होणारं नुकसान" कोणतीही नवीन गोष्ट करताना काय चुका होऊ शकतील हे शोधण्यात आपण पटाईत असतो. उदा. पगारवाढ मागणे. पण निष्क्रियतेमुळे होणारं गंभीर नुकसान आपण लक्षात घेत नाही. आपण स्वतःलाच विचारू, मी ही कृती करणं किंवा हा निर्णय घेणं टाळलं, किंवा, अशाच अनेक कृती किंवा निर्णय टाळले, आणखी सहा महिने, बारा महिने, तीन वर्षांनंतर, माझं आयुष्य कसं असेल? त्याहीपुढचं आयुष्य कसं असेल, कल्पनाही करवत नाही. आणखी सविस्तर कल्पना करा: भावनिक, आर्थिक, शारीरिक परिणाम, वगैरे. मी हे केलं, आणि एक भयानक चित्र दिसू लागलं. मी स्वतःवरच विषप्रयोग करीत होतो. मी माझ्या बिझिनेसमधून बाजूला झालो नसतो, तर तो केव्हाही कोसळू शकला असता. मला कोणाची साथ मिळत नव्हती. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की आता मला निष्क्रिय राहणं शक्य नव्हतं. तर अशी ही तीन पानं. इतकीच. हीच भीती-निश्चिती. जर शून्य म्हणजे अत्यंत कमी परिणाम आणि १० म्हणजे सर्वात जास्त परिणाम असं प्रमाण ठरवलं, तर- माझ्या लंडन प्रवासातला धोका म्हणजे १ ते ३ पातळीचं तात्पुरतं, दूर करता येणारं दुःख होतं. त्याबदल्यात मला ८ ते १० पातळीचा सकारात्मक, आणि जवळजवळ कायमस्वरूपी फायदा झाला असता. म्हणून मी तो प्रवास केला. वरीलपैकी कोणतीच संकटं फिरकली नाहीत. थोडे अडथळे नक्कीच आले. मी स्वतःला बिझिनेसमधून बाहेर काढू शकलो. तो प्रवास वाढवत मी दीड वर्षं जगभर फिरलो. त्याच आधारावर मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं. त्यामुळेच आज मी इथे आलो आहे. वर्षातून निदान चार वेळा भीती निश्चिती केल्यामुळेच मी यशस्वी होत गेलो आणि अनेक संकटं टाळू शकलो. हा रामबाण उपाय नाही. काही वेळा भीतीमागे खरंच काही कारण असतं. (हशा) पण असा निष्कर्ष काढण्याआधी ती भीती सूक्ष्मपणे तपासली पाहिजे. आणि तरीही यामुळे सगळेच प्रश्न सुटणार नाहीत. पण निदान बरेचसे प्रश्न सोपे होतील. शेवटी, आजच्या काळातल्या माझ्या एका आवडत्या स्थितप्रज्ञाचं उदाहरण देतो. हे आहेत जरझी ग्रेगोरेक ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत चार वेळा जागतिक विजेते. राजकीय कारणामुळे निर्वासित. प्रसिद्ध कवी. वय वर्षे ६२. आजही ते मला आणि आपल्यापैकी अनेकांना वरचढ ठरतील. प्रभावी व्यक्तिमत्व. मी त्यांच्या "स्टोआ"वर पोर्च वर बराच काळ घालवला. आयुष्य, प्रशिक्षण याबद्दल प्रश्न विचारले. "सॉलिडॅरिटी इन पोलंड" शी ते संलग्न होते. ही अहिंसात्मक चळवळ सामाजिक बदलासाठी सक्रिय होती. सरकारने हिंसेच्या बळाने ती दडपून टाकली. अग्निशामक दलातली त्यांची नोकरी गेली. त्यांच्या मार्गदर्शकाचं अपहरण, छळ आणि हत्या करून नदीत फेकून देण्यात आलं. ग्रेगोरेकनाही धमकी मिळाली त्यांना पोलंड सोडून पत्नीसहित देशोदेशी भटकावं लागलं. शेवटी ते अमेरिकेत पोहोचले. जवळ काहीच सामान नव्हतं. ते फरशीवर झोपत. आता ते वुडसाईड, कॅलिफोर्निया येथे एका सुरेख घरात राहतात. आजवर मला जगात दहा हजारावर लोक भेटले असतील. त्या सर्वांत, यश आणि आनंद या बाबतीत मी यांचा क्रमांक पहिल्या दहात लावेन. आता नीट ऐका, महत्त्वाची गोष्ट पुढेच आहे. काही दिवसांपूर्वी मी त्यांना विचारलं, स्थितप्रज्ञतेबद्दल आपण काही वाचलं आहे काय? त्यावर त्यांनी दोन पानी उत्तर पाठवलं. हे काही निराळंच होतं. कारण ते मितभाषी आहेत. (हशा) त्यांना स्थितप्रज्ञता ठाऊक होती, इतकंच नव्हे, तर दरवेळी महत्त्वाचे निर्णय घेताना, किंवा काही निराळं करताना, आपल्या तत्त्वांचा आणि नीतिनियमांचा पाठपुरावा करताना त्यांनी स्थितप्रज्ञता आणि भीती निश्चिती सारखीच एक पद्धत वापरल्याचं पाहून मी चकित झालो. शेवटच्या दोन गोष्टी: एक: त्यांच्या कल्पनेत सर्वात सुंदर आयुष्य आहे स्थितप्रज्ञाचं. आणि शेवटी, त्यांचा मंत्र, जो ते प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात. तुम्हीही तो प्रत्येक गोष्टीसाठी वापरू शकता: "सोपे पर्याय, कठीण आयुष्य" "कठीण पर्याय, सोपं आयुष्य" कठीण पर्याय : जे बोलायची, विचारायची, करायची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते, ते. बरेचदा, आपण करायलाच हव्यात अशा या गोष्टी असतात. मोठाली आव्हानं किंवा समस्या कधीच आरामशीर संवादाने सुटत नाहीत. मग ते संवाद स्वतःशी असोत की इतरांबरोबरचे असोत. म्हणून म्हणतो, स्वतःलाच विचारा: तुम्हांला कोणत्या बाबतीत ध्येयनिश्चिती पेक्षा भीती-निश्चिती जास्त महत्त्वाची वाटते? सेनेका यांचे शब्द सतत ध्यानी ठेवा: "वास्तवापेक्षा कल्पनेतच आपण जास्त त्रास भोगतो." आभारी आहे. (टाळ्या)