सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का? मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे. खरं तर, मी निघालोय. (हशा) तीन विषय आहेत, नाही का, या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत मला जे सांगायचं आहे त्याच्याशी. एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही, भविष्याबाबत. काही कल्पना नाही यातून काय घडेल. मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो. नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं. तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल (हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही. आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे. पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात, म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?” आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता, तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा) पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल, ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना? धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं. मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे. त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे. तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं २०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही - गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - की हे जग कसं असेल पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते, विलक्षण आहे. आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की आपण सर्वांनी मान्य केली आहे, मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली, नाही का? काय काय करु शकली ती. आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच, की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे. तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की, सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात. आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो. म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये, आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे. (टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं. खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून. तर, माझा जन्म झाला... नको. (हशा) नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती मागे, चित्र काढत बसली होती, आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं. त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?” आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.” ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.” "मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली. (हशा) जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा) अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता. त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता. तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती. एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता. तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती, ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती. टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा) त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश जिथं ते तीन राजे येतात. आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह. हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला, कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो, "तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का? ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.” असो, तर ती तीन मुलं आली - चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली, आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.” आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.” आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा) या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात. त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील. बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही. आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे. आपल्याला हे माहितच आहे की, तुमची चुकायची तयारी नसेल, तर तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही. तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात. त्यांना चुकण्याची दहशत बसते. आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो. आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं चुका करणं सर्वात खराब समजलं जातं. आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला. तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात. समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे, की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही, आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो. तर हे असं का आहे? सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो. खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो. यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते. (हशा) खरं तर, आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो. स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं. शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना? बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना? सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल कधीतरी सात वर्षांचा. तो असणार कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते? (हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील, शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,” विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे. आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.” (हशा) असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो, आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे. माझ्या मुलाला यायचं नव्हतं. मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची. त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं, पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा. तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता. लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती, कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं. असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता, आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.” आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता, कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं. (हशा) पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर आणि जगभर प्रवास केल्यावरः जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे. प्रत्येक. कुठेही गेलात तरी. तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही. एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय, मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय. जगात सर्वत्र. आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे, कला विषयांमधील श्रेणीरचना. कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही जी दररोज मुलांना नृत्य शिकवते जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का? का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील. मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील. आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का? (हशा) खरंच, काय होतं तर, मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो. आणि थोडंसं एका बाजूला. जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?” माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता, यातून नक्की कोणाला यश मिळतं, प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं, कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं - मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश जगभरातून आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का? हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे. आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा) आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का, आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे. तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात, आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय. माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं - सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो. ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला. आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात. ते आपल्या शरीराला समजतात आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का? (हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं. तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल, तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या, आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा. (हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे, हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील. आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर. आणि त्याला एक कारण आहे. ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही १९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच. त्या सर्व बनवल्या गेल्या औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी. तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर. पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून, या सबबीवर की तुम्हाला या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना? संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस; कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस. हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला, कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून. जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया विद्यापीठीय प्रवेशाची. आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान, तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही, कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या. आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा. जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं - तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र आणि लोकसंख्येचा विस्फोट. एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का? माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची. तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल. आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा) पण आता पदवीधर मुलं सहसा घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी, कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात, आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते. ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे. आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात. आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत. पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो, आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो. आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो. दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते. जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून, बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे. मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत. प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची - बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून. हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो, मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो. कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात. कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का? कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं. माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर - सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा) पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते - तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा, ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते, ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते, ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते. जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात, फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो. मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा) वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का, जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं, तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद? मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही, तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा) आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे, ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो. खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन, तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे. तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.' ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो, तुम्ही पहातच आहात कसा. असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो, "जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना, खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील, तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती, ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं, आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता. तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा) असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती. असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये, आपल्या आईबरोबर ती गेली, आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं, आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी - तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं, तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही, आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन, मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.” ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.” आणि ते तिला सोडून गेले. पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले, फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली. आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले, "मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे. तिला डान्सक्लासला घेऊन जा." मी म्हणालो, “मग काय झालं?” ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं. आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक. असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.” ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते, ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते. पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली, ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी - एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे काही सर्वात यशस्वी संगीत नाटक निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे, आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं शांत रहायला. आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः परवा अल् गोअर बोलले पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल. माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं, जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत. आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी. आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही. आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत. जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक पृथ्वीवरुन नाहीसे झाले, तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली, तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.” आणि त्याचं बरोबरच आहे. टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान. आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही, पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.