मी आणि माझा जुळा भाऊ. आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. माझा हा भाऊ खूप प्रेमळ आहे. आपण जुळ्यांपैकी एक असलो, की पक्षपातीपणा चट्कन ओळखायला शिकतो. त्याला माझ्यापेक्षा जरासं मोठं बिस्कीट मिळालं, की माझे प्रश्न सुरु होत. तशी माझी काही उपासमार होत नव्हती, हे उघडच आहे. (हशा) मोठेपणी मानसशास्त्रज्ञ झाल्यावर एक वेगळा पक्षपातीपणा माझ्या लक्षात येऊ लागला. आणि तो म्हणजे, आपण मनापेक्षा शरीराला किती जास्त महत्त्व देतो. विद्यापीठात नऊ वर्षं परिश्रम करून मी मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवली. पण तुम्हांला काय सांगू, माझं कार्ड बघून कितीतरी लोक म्हणतात, अरे ! मानसशास्त्स्त्रज्ञ म्हणजे खरा डॉक्टर नाही.. म्हणजे कार्डावर तसं छापायला हवं का? डॉ. गाय विंच. नुसतेच मानसशास्त्रज्ञ. (खरे डॉक्टर नव्हेत.) (हशा) आपण शरीराच्या बाजूने पक्षपातीपणा करतो, हे मला सर्वत्र पाहायला मिळतं. मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्यांचा ५ वर्षांचा मुलगा झोपण्यापूर्वी दात घासण्यासाठी सिंकजवळ स्टूलवर चढला. तो पाय घसरून पडला, आणि त्याला खरचटलं. तो मिनिटभर रडला, पण मग उठून परत स्टूलवर चढला, आणि जखमेवर लावायला त्याने बँडेड शोधून काढली. या मुलाला अजून बुटाची नाडीसुद्धा नीट बांधता येत नाही. पण त्याला ठाऊक आहे, की जखमेवर पट्टी लावली तर जंतुसंसर्ग होणार नाही. तसंच, दातांची काळजी घेण्यासाठी ते दिवसातून दोनदा घासायला हवेत. आरोग्याची आणि दातांची काळजी कशी घ्यावी,हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, हो ना? अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून. पण मानसिक आरोग्याविषयी आपल्याला काय माहिती आहे? काहीही नाही. मानसिक आरोग्याविषयी आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? काहीही नाही. जितका वेळ दातांची काळजी घेण्यात घालवतो, तितकाही आपण मनासाठी देत नाही. असं का? आपण आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं का मानतो? मनावरचे आघात शारीरिक जखमांपेक्षा जास्त टिकतात. उदाहरणार्थ, अपयश, अवहेलना, किंवा एकटेपणा. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते वाढत जातात. आपल्या आयुष्यावर त्यांचा अकल्पित परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या मानसिक जखमांसाठी वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध केलेले उपचार उपलब्ध असूनही आपण ते वापरत नाही. तसे ते वापरावेत, असं आपल्याला सुचतसुद्धा नाही. "नैराश्य आलं आहे का? झटकून टाक ते. काहीतरी भरून घेतलं आहेस डोक्यात." कल्पना करा, एखाद्याचा पाय मोडला आहे. त्याला आपण सांगतो आहोत, "चल, झटक पाय, आणि चाल. काहीतरी भरून घेतलं आहेस पायात." (हशा) शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यामधली दरी बुजवण्याची वेळ आली आहे. जुळ्या भावंडांप्रमाणे त्यांना समान लेखण्याची वेळ आली आहे. सांगायची गोष्ट म्हणजे, माझा भाऊ सुद्धा मानसशास्त्रज्ञ आहे. म्हणजे तोही खरा डॉक्टर नव्हेच. (हशा) पण आम्ही एकत्र शिक्षण घेतलं नाही. मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी अटलांटिक समुद्र ओलांडून न्यू यॉर्क शहरात गेलो. माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट. त्यावेळी प्रथमच आमची ताटातूट झाली. आम्हांला दोघांनाही ती सहन झाली नाही. निदान तो घरी कुटुंब आणि मित्रांच्या सोबतीतच राहिला, पण मी तर एका नव्या देशात एकटा राहत होतो. आम्हांला एकमेकांची फार आठवण येई. त्यावेळी फोनवरून दुसऱ्या देशात बोलणं प्रचंड महाग होतं. आम्हांला आठवड्याला फक्त पाच मिनिटं बोलणं परवडत असे. त्या वर्षी प्रथमच आम्ही आमच्या वाढदिवसाला एकत्र नव्हतो. म्हणून आम्ही ठरवलं, या आठवड्यात चैन करू. १० मिनिटं बोलू. (हशा) सकाळभर मी खोलीत येरझारे घालत होतो. त्याचा फोन येण्याची वाट पाहत होतो. फार वाट पाहिली. फार वाट पाहिली. पण फोन आलाच नाही. दोन्ही देशांतल्या वेळांत फरक असल्यामुळे मला वाटलं, मित्रांबरोबर गेला असेल. करेल नंतर. त्या वेळी मोबाईल नव्हते. पण त्याचा फोन आलाच नाही. मग वाटलं, १० महिने दूर राहिल्यावर त्याला माझी तितकीशी आठवण येत नसावी. सकाळीच यायला हवा होता तो फोन रात्रीपर्यंत आला नाही. रात्र संपता संपेना. मी तळमळत होतो. दुसऱ्या दिवशी जाग आल्याबरोबर फोन दिसला, आणि माझ्या लक्षात आलं, की आदल्या दिवशी येरझारे घालताना माझ्याच लाथेने रिसिव्हर खाली पडला होता. मी धडपडत उठलो, आणि रिसिव्हर जागेवर ठेवला. पुढच्याच क्षणी फोन वाजला. हो, माझ्या भावाचाच. किती चिडला होता तो!= (हशा) त्यानेही ती रात्र तळमळत काढली होती. काय झालं, ते त्याला समजवायचा मी प्रयत्न केला. "मला हे समजत नाही, की माझा कॉल आला नाही, तर तू फोन उचलून मला का केला नाहीस?" बरोबरच होतं त्याचं. मी त्याला फोन का केला नाही? या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नव्हे, पण आज मला मिळालं. आणि ते अगदी सोपं आहे. एकटेपणा. एकटेपणा मनावर खोल आघात करतो. त्यामुळे आकलनशक्ती विपरीत कार्य करते. विचारांचा गोंधळ उडतो. कोणालाच आपली पर्वा नाही, असं वाटतं. प्रत्यक्षात तसं नसलं, तरीही. इतरांशी संपर्क साधायची फार भीती वाटते. कारण, आपण नाकारले जाऊ, मग दुःख होईल. आधीच दुःख असह्य झालं आहे. आणखी नको. त्या काळात मला खरोखरच एकटेपणाने गिळून टाकलं होतं. पण दिवसभर माणसांच्यात वावरत असल्याने ते माझ्या लक्षात आलं नाही. एकटेपणाची व्याख्या माणसागणिक निराळी असते. आपल्याला इतरांपासून भावनिक किंवा सामाजिक दृष्ट्या तुटल्यासारखं वाटतं का, यावर ते अवलंबून आहे. मला तसं वाटत होतं. एकटेपणावर पुष्कळ संशोधन झालं आहे. ते फार भयंकर आहे. एकटेपणामुळे आयुष्य दुःखी होतं. मृत्यू ओढवू शकतो. ही थट्टा नव्हे. दीर्घकाळ एकटेपणा सहन केल्यामुळे अकाली मृत्यूचं प्रमाण १४ टक्क्यांनी वाढतं. १४ टक्के! एकटेपणामुळे रक्तदाब वाढतो. कोलेस्टेरॉल वाढतं. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक आजार आणि रोग होऊ शकतात. यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलं आहे, की हे सर्व दुष्परिणाम लक्षात घेता, दीर्घकाळ एकटेपणा सहन करणं हे दीर्घायुष्य आणि आरोग्याला धूम्रपानाइतकंच हानिकारक आहे. सिगारेट्सच्या पाकिटावर निदान तसा इशारा दिलेला असतो. पण एकटेपणाचं तसं नाही. म्हणूनच आपण मानसिक आरोग्याला अग्रक्रम देऊन ते सांभाळलं पाहिजे. कारण मनाला जखम झाली आहे हे कळलंच नाही, तर तिच्यावर इलाज कसा करणार? आकलनशक्ती आणि विचार यांच्यावर परिणाम करणारी, एकटेपणा ही काही एकच मानसिक जखम नव्हे. अपयशामुळेही तसं होऊ शकतं. मी एका बालवाडीत गेलो असताना, तिथे तीन मुलं एकसारखी प्लास्टिकची खेळणी घेऊन खेळत होती. लाल बटण सरकवलं, की एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू बाहेर यायचं. एका मुलीने जांभळं बटण सरकवलं. पिल्लू आलं नाही, तेव्हा ती रडायच्या बेताला आली. दुसरा मुलगा नुसतं तिला पाहूनच रडू लागला. तिसऱ्या मुलीने सगळी बटणं सरकावून पाहिली. लाल बटण सरकावल्यावर पिल्लू बाहेर आलं, आणि ती आनंदाने ओरडू लागली. अपयशाला तोंड देण्याच्या तीन मुलांच्या या तीन तऱ्हा. पहिल्या दोन मुलांना लाल बटण सरकावणं सहज शक्य होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण, त्यांच्या मनाने त्यांची फसगत केली. त्यामुळे त्यांना ते अशक्य वाटलं. मोठ्या माणसांचीही अशी फसगत होत असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात, भावना आणि समज यांचे ठराविक साचे बनलेले असतात. अपयश किंवा निराशा पदरी आली, की आपण त्यानुसार वागतो. तुमचं मन अपयशाला कसा प्रतिसाद देतं, हे तुम्हांला ठाऊक आहे का? असायला हवं. कारण, जर तुमच्या मनाने तुम्हाला पटवलं, की हे काम तू करू शकणार नाहीस, आणि तुम्हांला ते पटलं, तर त्या दोन मुलांप्रमाणे तुम्ही स्वतःला असहाय मानू लागाल. मग तुम्ही लगेच प्रयत्न थांबवाल, किंवा मुळात प्रयत्न करणारच नाही. आणि मग तर तुमची खात्रीच पटेल, की आपण यशस्वी होऊच शकत नाही. यामुळेच कित्येक लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा पुष्कळ खालच्या दर्जाचं काम करतात. कारण, पूर्वीच्या एखाद्या अपयशाने त्यांना पटवलेलं असतं, की आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि ते त्यांना पटलेलं असतं. आपल्या मनाला एखादी गोष्ट पटली, की तो समज बदलणं फार कठीण असतं. हे एका कठीण प्रसंगातून मी शिकलो. त्या वेळी मी तरुण होतो, भावासोबत होतो. त्या रात्री आम्ही काही मित्रांसोबत मोटारीत बसून चाललो होतो. पोलिसांच्या गाडीने आम्हांला अडवलं. त्या भागात एक चोरी झाली होती, आणि ते चोरांना शोधत होते. एका पोलिसाने आमची गाडी चालवणाऱ्या मित्रावर विजेरीचा झोत टाकला. पुढच्या सीटवरच्या माझ्या भावावरही टाकला. त्यानंतर मागे, माझ्यावर. त्याचे डोळे विस्फारले. त्याने विचारलं, "तुला मी याआधी पाहिलं आहे. कुठे बरं ?" (हशा) मी म्हणालो, "पुढच्या सीटवर." (हशा) त्याला काहीही कळलं नाही. त्याला वाटलं, की मी ड्रग्ज घेतली असली पाहिजेत. (हशा) त्याने मला खेचून बाहेर काढलं. माझी झडती घेतली, आणि मला पोलिसांच्या गाडीजवळ नेलं. माझ्या नावाचं रेकॉर्ड तपासलं. एवढं सगळं झाल्यानंतरच पुढच्या सीटवरचा माझा जुळा भाऊ त्याला दिसला. तरीही मी निघालो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते, की "यात काहीतरी काळंबेरं आहे. मला फसवून निसटला आहेस तू." (हशा) मनात एखादा समज घट्ट झाला, की तो बदलणं फार कठीण असतं. अपयश आल्यावर खचून जाणं हे स्वाभाविक आहे. पण आपल्याला कधीच यश मिळणार नाही असा समज होऊ देता कामा नये. असहायतेच्या भावनांचा सामना केला पाहिजे परिस्थितीवर ताबा मिळवला पाहिजे. हे नकारात्मक चक्र सुरु होण्याअगोदरच थांबवलं पाहिजे. [भावनांना आवर घाला.] मन आणि भावना यांना आपण आपले विश्वासू मित्र मानतो, पण ते तसे नसतात. ते एखाद्या लहरी मित्रासारखे असतात. लहरीनुसार ते आपल्याला पाठिंबा देऊ शकतात, किंवा आपल्यावर उलटूही शकतात. माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका स्त्रीचं उदाहरण सांगतो. वीस वर्षांच्या संसारानंतर तिचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने आंतरजालावरून दुसरा जोडीदार शोधला, आणि भेट ठरवली. तिला तो अतिशय सुस्वभावी, यशस्वी वाटला. आपण त्याला खरोखर आवडलो आहोत, असंही वाटलं. आनंदाने तिने नवा ड्रेस खरेदी केला, आणि न्यू यॉर्क मधल्या एका महागड्या बार मध्ये भेट ठरवली. दहाव्या मिनिटाला तो उठून उभा राहिला. "आपलं जमेलसं वाटत नाही." म्हणाला, आणि निघून गेला. कोणी आपल्याला नाकारणं फार दुःखदायक असतं. ती हादरून गेली. तिला जागचं हलता येईना. कसाबसा तिने मैत्रिणीला फोन केला. मैत्रीण म्हणाली, "मग? तुझी काय अपेक्षा होती? तुझं वजन किती वाढलं आहे पहा. तुला काही छानसं बोलताही येत नाही. एखादा देखणा, यशस्वी पुरुष तुझ्यासारख्या नालायक बाईला कसा स्वीकारेल?" धक्का बसला ना? मैत्रीण इतकी निर्दयपणे कशी बोलू शकते? पण मी जर सांगितलं, की हे त्या मैत्रिणीने म्हटलं नसून, त्या स्त्रीने स्वतःच म्हटलं होतं, तर तुम्हांला तितकासा धक्का बसणार नाही. आपण सगळे हे असंच करतो. खास करून नकार मिळाल्यावर. आपण आपल्यामधल्या दोष आणि कमतरतांचा विचार करू लागतो. आपण असे असायला हवे होतो, तसे नसायला हवे होतो.. स्वतःला नावं ठेवतो. फार निर्दयीपणे नसेल, पण आपण सगळे असं करतो. खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण नकारामुळे आधीच आपला आत्मसन्मान दुखावलेला असतो. तरीही आपण स्वतःला आणखी का दुखावतो? शरीराची जखम आपण मुद्दामहून आणखी दुखापत करून वाढवत नाही. हाताला जखम झाली, तर आपण असं नाही म्हणणार, "अरे वा! आता सुरीने आणखी कापून बघू, किती खोल कापता येतं ते!" पण मानसिक जखमा झाल्यावर बरेच वेळा आपण तसं करतो. का? कारण मानसिक आरोग्याची हेळसांड. मानसिक आरोग्याला अग्रक्रम न देणं. डझनावारी संशोधनांनी दाखवून दिलं आहे, की जेव्हा आत्मसन्मान ढासळतो, तेव्हा ताणतणाव आणि चिंताविकार यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढतं. अपयशामुळे, नाकारलं जाण्यामुळे जास्त दुःख होतं. आणि त्यातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो. म्हणून, नाकारलं गेल्यावर प्रथम काय करायला हवं? आत्मसन्मान बळकट करायला हवा. खलनायक बनून त्याच्यावर आणखी वार अजिबात करायचे नाहीत. मनाला दुखापत झाली असेल, तर स्वतःशी दयाळूपणे वागा. जवळच्या मित्राने तुमच्याशी जसं वागावंसं वाटत असेल, तसंच. [आत्मसन्मानाचं रक्षण करा.] मानसिक आरोग्याला विघातक ठरणाऱ्या सवयी ओळखून त्या बदलायला हव्यात. यापैकी सर्वत्र आढळणारी एक वाईट सवय म्हणजे रवंथ करणे. म्हणजे तेच तेच विचार पुन्हा पुन्हा मनात घोळवणे. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर ओरडले असतील, किंवा शिक्षकांनी वर्गात सर्वांसमोर अपमान केला असेल किंवा मित्राशी मोठं भांडण झालं असेल, तर तो प्रसंग अनेक दिवस सतत डोक्यात घोळत राहतो. काही वेळा यात आठवडे निघून जातात. त्रासदायक घटनांबद्दल रवंथ करण्याची सवय सहज लागू शकते. तिची मोठी किंमत मोजावी लागते. कारण नकारार्थी विचार करण्यात इतका वेळ घालवण्यामुळे अनेक विकार जडण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, नैराश्य, दारूचं व्यसन, अन्नासंबंधी विकार, आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार. यातली समस्या अशी आहे, की विचारांचा रवंथ करण्याची इच्छा प्रबळपणे आणि फार महत्त्वाची वाटू शकते. त्यामुळे ही सवय मोडणं अतिशय कठीण जातं. हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कारण, साधारण वर्षभरापूर्वी मला स्वतःला ही सवय लागली होती. माझ्या जुळ्या भावाला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याचा कॅन्सर अतिशय आक्रमक स्वरूपाचा होता. त्याच्या शरीरावर सगळीकडे सहज दिसतील अशी गळवं आली होती. त्याला तातडीने जोरदार केमोथेरपी सुरु करणं गरजेचं होतं. मला सतत वाटत राहिलं, त्याला काय सहन करावं लागत असेल, त्याला किती त्रास होत असेल. खरं तर त्याने मुळीच तक्रार केली नव्हती. एकदाही नाही. त्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. त्याची मानसिक ताकद अफाट होती. मी शरीराने सुदृढ असलो, तरी माझं मन दुबळं होतं. पण मला उपाय ठाऊक होता. संशोधन सांगतं, की विचारांचा रवंथ करण्याची तीव्र इच्छा मोडायला दोन मिनिटांचा व्यत्यय देखील पुरेसा होतो. त्यामुळे दर वेळी नकारात्मक, त्रासदायक, किंवा चिंतादायक विचार मनात आला, की मी दुसरीकडे लक्ष वळवत होतो. ती इच्छा नष्ट होईपर्यंत. एका आठवड्यात माझा दृष्टिकोन बदलून मी जास्त सकारात्मक आणि आशावादी झालो. [नकारात्मक विचारांचा सामना करा.] केमोथेरपीनंतर ९ आठवडयांनी माझ्या भावाचा कॅट स्कॅन करण्यात आला. त्याचा निकाल आला तेव्हा मी त्याच्या जवळ होतो. त्याची सर्व गळवं नाहीशी झाली होती. त्याला आणखी तीन वेळा केमोथेरपी करावी लागणार होती. पण तो बरा होणार होता, हे निश्चित. हा दोन आठवड्यांपूर्वीचा फोटो. एकटेपणा घालवण्यासाठी कृती केल्यामुळे, अपयशाला निराळा प्रतिसाद दिल्यामुळे, आपला आत्मसन्मान बळकट केल्यामुळे, आणि नकारात्मक विचारांचा सामना केल्यामुळे मानसिक जखमा भरून येतात, इतकंच नव्हे, तर मानसिक लवचिकता वाढते, आपण भरभरून जगू शकतो. शंभरेक वर्षांपूर्वी शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची सुरुवात झाली, आणि काही दशकांतच मृत्यूदर ५० टक्क्यांनी खाली आला. मला वाटतं, आपण सर्वानी मानसिक आरोग्याची काळजी घेणं सुरु केलं, तर आपल्या आयुष्याचा स्तर असाच वेगाने उंचावेल. तुम्हांला कल्पना करता येते का? सर्वांचं मानसिक आरोग्य सुधारलं, तर ते जग कसं असेल? एकटेपणा कमी झाला, नैराश्य कमी झालं, तर? लोक अपयशावर मात करायला शिकले, तर? त्यांचा आत्मसन्मान वाढून, आपण सक्षम आहोत असं त्यांना वाटू लागलं तर? त्यांना जास्त आनंद आणि समाधान वाटू लागलं, तर? मी अशी कल्पना करू शकतो. कारण मला अशा जगात राहायचं आहे. माझ्या भावालाही अशा जगात राहायचं आहे. आपण सर्वांनी या माहितीचा वापर करून काही साध्या सवयींमध्ये बदल केले, तर आपण सगळे अशा जगात राहू शकू. खूप खूप धन्यवाद. (टाळ्या)