दृष्टी हे आपले सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक इंद्रिय आहे. आपण आपल्या भोवतालचं जग सतत बघत असतो आणि आपण काय पाहिलं हे तात्काळ ओळखून त्याचा अर्थ लावत असतो. प्रथम आपण याच गोष्टीचं एक उदाहरण घेऊ. मी तुम्हाला एका व्यक्तीचं छायाचित्र दाखवणार आहे. फक्त एक किंवा दोन सेकंदापुरतंच. आणि त्याचा चेहरा कोणती भावना दाखवतो ते तुम्ही ओळखायचं. तय्यार? हे बघा. अंत: स्फूर्तीने सांगा. काय पाहिलंत तुम्ही? तर आम्ही प्रत्यक्षात १२० जणांची पाहणी केली. आणि आम्हाला मिश्र निष्कर्ष मिळाले. या चेहऱ्यावर लोकांनी कोणती भावना पाहिली त्याबद्दल त्यांचं एकमत नव्हतं. कदाचित तुम्ही अस्वस्थता पाहिली असेल. हेच उत्तर आम्हाला बहुतेक वेळा मिळालं. पण तुमच्या डावीकडची व्यक्ती म्हणू शकते, की मी खेद किंवा अविश्वास पाहिला. आणि तुमच्या उजवीकडचं कोणीतरी आणखी काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगू शकते. आशा किंवा समानुभूती, असं काहीतरी. परत बघा, आपण सगळे याच चेहऱ्याकडे बघत आहोत. आपण काहीतरी पूर्णपणे वेगळंच बघू शकतो. कारण, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं, ती खरंतर आपल्या स्वतःच्या मनातली प्रतिमा असते. अर्थात, अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग कसं पाहतो, त्याची. मी त्यातली काही सांगणार आहे. उदाहरणार्थ, डाएट करणारे लोक. यांना सफरचंदं मोठी दिसतात, कॅलरीज न मोजणाऱ्या लोकांना दिसतात, त्याहून मोठी. मंदीतून बाहेर येणाऱ्या सॉफ्टबॉल खेळाडूंना बॉल छोटा दिसतो, यशस्वी काळात दिसतो त्याहून छोटा. खरं तर, आपल्याला इतर लोक कसे दिसतात, अगदी राजकारणीसुध्दा, हे आपल्या राजकीय कल्पना ठरवतात. तर, मी आणि माझ्या संशोधन गटाने हा प्रश्न विचारात घ्यायचे ठरवले. २००८ साली बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढत होते अगदी पहिल्या वेळी, आणि निवडणुकीच्या एक महिना आधी आम्ही शेकडो अमेरिकन लोकांची पाहणी केली. या पाहणीत आम्हाला आढळून आलं, की काही लोकांना, अमेरिकन लोकांना, वाटत होतं, ओबामा या छायाचित्रांत जसे दिसतात, तसेच ते प्रत्यक्षात आहेत. या लोकांपैकी ७५ टक्के लोकांनी खऱ्या निवडणुकीत ओबामांना मत दिलं. काही इतर लोकांना मात्र, ओबामा या छायाचित्रांत दिसतात तसेच आहेत, असं वाटत होतं. या लोकांपैकी ८९ टक्के लोकांनी मककीन यांना मत दिलं. आम्ही ओबामांची बरीच छायाचित्रं लोकांना दाखवली. पण एका वेळी एकच दाखवलं. त्यामुळे या छायाचित्रांमध्ये आम्ही काय बदल करत होतो, हे लोकांना समजलं नाही. आम्ही कृत्रिमरीत्या त्यांची रंगकांती बदलून ती फिकट किंवा गडद करीत होतो. हे कसं शक्य आहे? मी जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू, किंवा घटना पाहते, त्यावेळी दुसऱ्या कोणाला दिसतं, त्याहून मला काहीतरी पूर्णपणे वेगळंच दिसतं. हे कसं घडू शकतं? तशी कारणं तर पुष्कळ आहेत. पण त्यातल्या एका कारणासाठी डोळ्यांचं कार्य जास्त समजावून घेतलं पाहिजे. तर दृष्टी वैज्ञानिक जाणतात, की खरंतर एका क्षणात पाहून आपल्याला मिळणारी एकंदरीत माहिती तशी फारच थोडकी असते. जे आपण अगदी सूक्ष्म, स्वच्छ, आणि अचूक पाहू शकतो, ते केवळ आपल्या लांब धरलेल्या हाताच्या अंगठ्याच्या पृष्ठफळाइतकंच असतं. त्याभोवतीचं सगळं अंधुक असतं, त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आलेल्यापैकी बरंचसं संदिग्ध जाणवतं. पण आपल्याला, आपण काय पाहिलं ते स्पष्ट करून घेऊन त्याचा अर्थ लावावा लागतो. आणि आपलं मन या गाळलेल्या जागा भरून काढायला मदत करतं. यामुळेच, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. आणि अशा प्रकारे आपण जे पाहतो ते आपल्या मनातलं चित्र असतं. तर, मी एक सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे, आणि हे असे प्रश्न माझं लक्ष वेधून घेतात. माणसांतले मतभेद मला मुग्ध करतात. हे असं का घडत असेल? कुणाला पेला अक्षरशः अर्धा भरलेला दिसू शकतो, तर कुणाला तो अक्षरशः अर्धा रिकामा दिसू शकतो. एखाद्या माणसाच्या विचारांत आणि भावनांत असं काय असेल, की ज्यामुळे त्याला जग पूर्णपणे वेगळं दिसत असेल? आणि त्यामुळे खरंच काही फरक पडतो का? तर हे प्रश्न हाताळण्याची सुरुवात म्हणून, मी आणि माझ्या गटाने एका विषयात खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा तो विषय म्हणजे आपलं आरोग्य आणि धडधाकटपणा. जगभरातले लोक वजन काबूत ठेवण्यासाठी धडपड करताहेत. आणि वजन वाढू न देण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आपल्या मदतीला हजर आहेत. उदाहरणार्थ, आपण अगदी पक्कं ठरवतो, सुट्ट्यांनंतर व्यायाम सुरु करण्याचं. पण प्रत्यक्षात, बहुतेक अमेरिकन लोकांना आपले नवीन वर्षाचे संकल्प वॅलेंटाईन डे येईपर्यंत मोडलेले आढळतात. आपण स्वतःला उत्तेजन देत असतो. स्वतःला सांगत असतो, या वर्षी नक्कीच पुन्हा आकारात येऊ. पण आपलं वजन प्रमाणात आणायला तितकं पुरेसं नसतं. तर, असं का? अर्थात, याला एक साधं उत्तर नाही. पण आपल्या विरोधात जाणारी आपल्या मनाची दृष्टी हे यामागचं एक कारण आहे, असा माझा युक्तिवाद आहे. काही लोकांना व्यायाम अक्षरशः जास्त कठीण वाटतो तर काही लोकांना तो अक्षरशः जास्त सोपा वाटतो. तर या प्रश्नांची चाचणी घेताना, पहिली पायरी म्हणून आम्ही लोकांच्या प्रकृतीची वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. आम्ही त्यांच्या कमरेचा परीघ मोजला, त्यांच्या नितंबांच्या परिघाच्या तुलनेत. कंबर-ते-नितंब गुणोत्तर जास्त असणं हे तुलनेनं कमकुवत आरोग्याचं लक्षण आहे. ही मोजमापं गोळा केल्यानंतर आम्ही सहभागी लोकांना एका रेषेपर्यंत जास्तीचं वजन उचलून चालत जायला सांगितलं, एक प्रकारची शर्यतच. पण तसं करण्याआधी त्यांना अंतिम रेषेपर्यंतचं अंतर किती, याचा अंदाज बांधायला सांगितला. आम्हाला वाटलं, की त्यांना ते अंतर किती भासतं हे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असेल. आणि आम्हाला काय आढळलं? तर, कंबर-ते-नितंब गुणोत्तर या अंतराच्या धारणेचं भाकित करीत होतं. शारीरिकदृष्ट्या बेढब आणि अक्षम लोकांना अंतिम रेषेपर्यंतचं अंतर खरोखरच पुष्कळ जास्त दिसत होतं, सुदृढ लोकांना दिसलं त्या तुलनेत. लोकांचं स्वास्थ्य, त्यांची परिस्थितीबद्दलची धारणा बदलत होतं. पण तसंच आपलं मनही ती बदलू शकतं. प्रत्यक्षात, आपलं शरीर आणि मन, मिळून काम करतात आणि त्यानुसार आपली परिस्थितीबद्दलची धारणा बदलतात. यावरून आम्हाला असं वाटलं, की व्यायामाची प्रबळ प्रेरणा आणि जोरदार ध्येय असलेल्या लोकांना खरोखरच अंतिम रेषा जवळ दिसत असावी. प्रेरणा दुबळी असणाऱ्या लोकांना दिसते त्याहून जवळ. तर, प्रेरणांचा आपल्या धारणेवर परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी आम्ही दुसरी एक पाहणी केली. पुन्हा आम्ही लोकांच्या आरोग्याची वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. त्यांच्या कमरेचा परीघ मोजला आणि त्यांच्या नितंबांचा परीघ मोजला, आणि त्यांना आणखी काही आरोग्य चाचण्या करायला लावल्या. या चाचण्यांबद्दल आम्ही व्यक्त केलेली मतं ऐकून काही सहभागी म्हणाले, की याउप्पर आम्हाला व्यायामाची प्रेरणा वाटत नाही. आपली आरोग्याची ध्येयं पूर्ण झालीत असं त्यांना वाटत होतं. आता त्यांना आणखी काहीही करायचं नव्हतं. या लोकांपाशी प्रेरणा नव्हती. इतरांनी मात्र आमची मतं ऐकून, व्यायामाची प्रबळ प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. अंतिम रेषा गाठणं हे त्यांचं जोरदार ध्येय होतं. पण पुन्हा, त्यांना अंतिम रेषेपर्यंत चालायला सांगण्यापूर्वी अंतराचा अंदाज बांधायला सांगितला. अंतिम रेषा किती दूर असेल? आणि पुन्हा, आधीच्या पाहणीप्रमाणेच, आढळलं की, कंबर-ते-नितंब गुणोत्तर हे अंतराच्या धारणेचं भाकीत करतं. अक्षम लोकांना हे अंतर जास्त वाटलं, अंतिम रेषा जास्त लांब असल्यासारखी दिसली, सुदृढ लोकांना दिसली त्या तुलनेत. तरीही महत्त्वाचं म्हणजे, ज्या लोकांपाशी व्यायाम करण्याची प्रेरणा नव्हती, त्यांच्याच बाबतीत हे घडलं. तर दुसऱ्या बाजूला, व्यायामाची प्रबळ प्रेरणा असलेल्या लोकांना हे अंतर कमी दिसलं. अगदी सर्वात अक्षम लोकांना सुध्दा अंतिम रेषा तितकीच जवळ दिसली. कदाचित सुदृढ लोकांना दिसली त्याहूनही जवळ. तर आपलं आरोग्य, अंतिम रेषा किती लांब दिसते, हे बदलू शकतं. पण ज्या लोकांनी आपल्या आवाक्यातलं ध्येय ठरवलं होतं, जे त्यांना लवकरच पूर्ण करणं शक्य होतं, ज्यांना आपण ते पूर्ण करण्यास पात्र आहोत असं वाटत होतं, त्यांना व्यायाम खरोखरच सोपा वाटत होता. यावरून आम्हाला प्रश्न पडला, की अशी काही युक्ती आपण वापरू किंवा लोकांना शिकवू शकतो का, की ज्यामुळे त्यांची अंतराची धारणा बदलेल, आणि त्यांना व्यायाम सोपा वाटेल? मग आम्ही वळलो दृष्टी विज्ञान साहित्याकडे, काय करावं हे शोधण्याकरता. आणि या वाचनाच्या आधाराने एक युक्ती आम्ही योजली. तिचं नाव ठेवलं, "ध्येयावर लक्ष राहू द्या." ही एखाद्या प्रेरणादायी जाहिरातीतली घोषणा नव्हे. हे प्रत्यक्ष मार्गदर्शक तत्त्व आहे आपल्या परिस्थितीकडे कसं पहावं, याबद्दल. आम्ही ज्या लोकांना ही युक्ती शिकवली, त्यांना सांगितलं, की अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करा. इतरत्र बघणं टाळा. अशी कल्पना करा, की त्या ध्येयावर एक प्रकाशझोत आहे आणि त्याभोवतीचं सगळं धूसर आहे, किंवा ते दिसणं अवघड आहे. आम्हाला वाटलं, की या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागेल. या लोकांच्या समूहाची तुलना आम्ही एका संदर्भ गटाशी केली. त्यांना आम्ही सांगितलं, तुमच्या सभोवती पहा, अगदी सहज पाहिल्यासारखं. तुम्हाला अंतिम रेषा तर दिसेलच, पण कदाचित तुम्हाला उजव्या कडेचा कचऱ्याचा डबाही दिसेल. किंवा डाव्या कडेचा दिव्याचा खांब आणि ती माणसं. आम्हाला वाटलं, की ही युक्ती वापरणाऱ्या लोकांना ते अंतर दूरचं वाटेल. तर मग काय आढळलं असेल आम्हाला? त्यांना अंतराचा अंदाज बांधायला सांगितला, तेव्हा त्यांची धारणा बदलण्यात ही युक्ती यशस्वी ठरली का? होय. ज्या लोकांनी नजर ध्येयावर ठेवली, त्यांना अंतिम रेषा ३० टक्के जवळ दिसली. ज्या लोकांनी सहज सभोवती पाहिलं, त्यांच्या तुलनेत. आम्हाला हे खूप छान वाटलं. आम्हाला खरंच खूप आनंद झाला, कारण याचा अर्थ असा, की या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागला. पण महत्त्वाचा प्रश्न असा, की यामुळे व्यायाम खरोखरच सोपा होईल का? यामुळे व्यायामाचा दर्जादेखील सुधारू शकेल का? यानंतर आम्ही सहभागींना सांगितलं, की आता तुम्हाला अंगावर जास्तीचं वजन बाळगून अंतिम रेषा गाठायची आहे. आम्ही त्यांच्या घोट्यावर वजनं बांधली. त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १५ टक्के भरतील एवढी. आम्ही त्यांना गुडघे वर उचलून जलद चालत अंतिम रेषा गाठायला सांगितलं. आम्ही हा व्यायाम अवघड बनवला, पण अगदी माफक प्रमाणातच. अशक्य कोटीत नव्हे. इतर व्यायामांप्रमाणेच, जे खरोखरच आपलं आरोग्य सुधारतात. तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की, ध्येयावर नजर ठेवल्यामुळे आणि अचूक अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांचा व्यायामाचा अनुभव बदलला का? होय. बदलला. ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं, की त्यांना हा व्यायाम करण्यासाठी १७ टक्के कमी श्रम करावे लागले. जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत. यामुळे त्यांचा व्यायामाचा व्यक्तीनिष्ठ अनुभव बदलला. तसंच त्यांच्या व्यायामाचं वस्तुनिष्ठ स्वरूपही बदललं. ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, ते प्रत्यक्षात २३ टक्के जास्त जलद चालले, जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत. याचं यथार्थ चित्रण करायचं झालं तर, २३ टक्के वाढ म्हणजे, १९८० सालच्या शेव्ही सायटेशन च्या बदल्यात २०१५ सालची शेव्हरोले कॉरव्हेट मिळवणं. यामुळे आम्ही खूप आनंदित झालो. कारण याचा अर्थ असा, की या बिनखर्चाच्या युक्तीने मोठाच परिणाम केला होता. शिवाय ती वापरणंही सोपं होतं, लोक सुदृढ असोत की अजून त्यासाठी धडपडणारे असोत. ध्येयावर नजर ठेवल्यामुळे व्यायाम सोपा दिसू आणि वाटू लागला. अगदी त्याही वेळी, जेव्हा लोक जास्त जलद चालल्यामुळे जास्त मेहनत करीत होते. आता, मला ठाऊक आहे, की सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ जास्त जलद चालणं नव्हे. पण ध्येयावर नजर ठेवणं ही एक जास्तीची युक्ती तुम्ही वापरू शकता. निरोगी जीवनशैली वाढीस लावण्यासाठी. आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो याविषयी अजूनही तुमची खात्री पटली नसेल, तर मी हे एक शेवटचं उदाहरण देते. स्टोकहोममधल्या एका रस्त्याचं हे छायाचित्र. त्यावर दोन मोटारी आहेत. मागची मोटार पुढच्या मोटारीपेक्षा खूप मोठी दिसते. पण प्रत्यक्षात, या दोन्ही मोटारी एकाच आकाराच्या आहेत. पण आपल्याला त्या तशा दिसत नाहीत. तर, याचा अर्थ काय? आपल्या दृष्टीत बिघाड झाला आहे, की आपल्या मेंदूत गडबड आहे? नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही. आपली दृष्टी अशा प्रकारे काम करते, इतकंच. आपल्याला कदाचित जग निराळं दिसेल, कधी त्याचा वस्तुस्थितीशी मेळ जुळणार नाही. पण याचा अर्थ, कुणीतरी एक बरोबर आणि दुसरा कुणी चूक ठरतो, असा होत नाही. आपण आपापल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो, पण आपण स्वतःला ते निराळ्या प्रकारे बघायला शिकवू शकतो. जशा, माझ्या आयुष्यातल्या वाईट दिवसांच्या आठवणी. मी कंटाळलेली, चिडलेली, थकलेली असते. अजून पुष्कळ काम शिल्लक असतं. आणि माझ्या डोक्यावर एक मोठा काळा ढग तरंगत असतो. आणि अशा वाईट दिवसांत मला माझ्या आजूबाजूचे सगळेच लोक खिन्न दिसतात. मी एखाद्या कामाला मुदतवाढ मागितली की माझा सहकारी चिडलेला दिसतो. माझी मीटिंग उशिरा संपल्यामुळं मी लंचला उशिरा गेले, की माझी मैत्रीण वैतागलेली दिसते. आणि दिवसाअखेरी, माझा नवरा निराश दिसतो, कारण मला सिनेमाला जाण्याऐवजी झोपायचं असतं. आणि या अशा प्रकारच्या दिवसांत जेव्हा मला प्रत्येकजणच अस्वस्थ आणि रागावलेला दिसतो, तेव्हा मी याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची स्वतःला आठवण करून देते. कदाचित माझा सहकारी गोंधळून गेला असेल, कदाचित माझ्या मैत्रिणीला काळजी वाटली असेल, आणि कदाचित माझ्या नवऱ्याला सहानुभूती वाटत असेल. म्हणजेच आपण सगळे आपापल्या मनाच्या दृष्टीनं जग बघतो. आणि काही वेळा, हे जग धोकादायक, अवघड, आणि भयानक दिसत असेलही. पण सतत तसंच दिसायला हवं, असं नाही. ते पहायची वेगळी नजर आपण स्वतःला शिकवू शकतो. आणि जग जास्त चांगलं आणि सोपं करण्याचा हा मार्ग आपल्याला सापडला, की कदाचित खरोखरच ते तसं होईलही. धन्यवाद. (टाळ्या )